महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद; जेईई अॅडव्हांस परीक्षेचा अभ्यास करण्यात अडचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:23 AM2020-04-04T11:23:09+5:302020-04-04T11:23:32+5:30
शिकवणी वर्ग संचालकांनी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आॅनलाइन शिकवणी करताना अडचणी येत आहेत.
अकोला: वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जेईई अॅडव्हांस परीक्षा शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढे ढकलली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी मिळणार असला तरी, अभ्यास कसा करावा, याची चिंता पालक व शिक्षकांना सतावत आहे. महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन मिळत नाही. अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
एप्रिल महिन्यात होणारी जेईई-मेन परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे नियोजित वेळापत्रकानुसार होणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. १७ मे रोजी होणारी जेईई अॅडव्हांस परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर जेईई अॅडव्हांस परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे; परंतु याबाबत निश्चिती नाही. ही परीक्षा आणखी लांबणीवरसुद्धा पडू शकते. जेईई अॅडव्हांस परीक्षेच्या निकालावर देशातील नामांकित २३ आयआयटी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित होतात. जेईई मेन आणि जेईई अॅडव्हांस परीक्षा तोंडावर असल्याने, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली होती. कनिष्ठ महाविद्यालयांसोबतच खासगी शिकवणी वर्गांमध्येसुद्धा विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्यात येत होती; परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गसुद्धा बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढलाच तर संचारबंदीमध्ये वाढसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय अभ्यास कसा करावा? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता, काही खासगी शिकवणी वर्ग संचालकांनी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आॅनलाइन शिकवणी करताना अडचणी येत आहेत.
विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे; परंतु सराव करताना, विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्या आम्ही सोडवू शकत नाही. परीक्षेची तयारी एक उत्साह असतो. विद्यार्थ्यांमधील तो उत्साह कमी झाला आहे. याचा परिणाम निश्चितच निकालावर होऊ शकतो. आम्ही आॅनलाइन मार्गदर्शन, सराव परीक्षा सुरू केली; परंतु अनेकांकडे संगणक नाहीत. त्यामुळे अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत.
-प्रा. मुकूंद पाध्ये, शिक्षण तज्ज्ञ.