कोरोनाच्या संकटातही उधळणार प्रेमाचे रंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:27+5:302021-02-14T04:18:27+5:30
रवी दामोदर अकोला : मनातील अस्पष्ट भावना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी हा दिवस ...
रवी दामोदर
अकोला : मनातील अस्पष्ट भावना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाचे संकट असतानाही तरुणाई प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यास सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत सोशल मीडियावर ‘नेट-भेट’ करण्यावर भर दिला जाणार आहे.
व्हॅलेंटाइन वीक सुरू झाल्यापासून अनेक जण व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी मोठी तयारी करीत असल्याचे चित्र आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी अनेक जण रेस्टॉरंटमध्ये जातात, गुलाब, चॉकलेट्स, ज्वेलरी खरेदी करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी तरुणाईसह रेस्टॉरंट सज्ज झाल्याचे चित्र आहे.
---------------------------------
प्रेमाच्या संदेशाची ऑनलाइन देवाणघेवाण
कॉलेच्या कट्ट्यावर फुलणारे प्रेम आता ऑनलाइन चावडीवर येऊन पोहोचले आहे. व्हॉट्सॲप व फेसबुकच्या माध्यमातून आज प्रेम संदेशाची देवाणघेवाण होणार आहे. दरम्यान, तरणाईमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी जिवलगाला गिफ्ट देण्यासाठी उत्साह दिसून येत आहे.
--------------------
लाल गुलाबाच्या मागणीत वाढ!
व्हॅलेंटाइन डेला प्रियकराने प्रेयसीला कुठलेही ‘गिफ्ट’ दिले तरी शेवटी प्रत्येकजण लाल गुलाब सोबत देतोच. प्रेमाचे प्रतीक असलेले टवटवीत असे गुलाबाचे फूल पाहून प्रेयसीच्या गालावरदेखील नकळतपणे गुलाबी छटा उमटते. व्हॅलेंटाइन वीकमध्ये बाजारात लाल गुलाबाची मागणी वाढल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.