दिलासादायक....दिल्लीच्या कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:47 PM2020-04-04T17:47:01+5:302020-04-04T17:50:21+5:30
उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला.
अकोला : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. मात्र, वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ संधिग्ध रुग्णांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. या सर्वांच्या वैद्यकीय अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथून ३१ मार्च रोजी १८ जणांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, उर्वरीत ९ जणांच्या अहवालाकडे लक्ष लागून असतानाच वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ संधिग्ध रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शनिवारी त्यात आणखी दोघांची भर पडल्याने पातुर येथील संधिग्ध रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. शिवाय, तेल्हारा तालुक्यातीलही दोघांना संधिग्ध रुग्ण म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
१८ जणांचे ‘स्वॅब’ पाठविले नागपूरलाआयसोलेशन कक्षात दाखल कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांपैकी १८ जणांचे ‘स्वॅब’ शनिवारी सकाळीच तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. यामध्ये पातूर येथील १३ संधिग्ध रुग्णांचे ‘स्वॅब’ असून, त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तांत्रिक अडचणीमुळे होत आहे दिरंगाईनागपूर येथील ‘व्हीआरडीएल’लॅबवर विदर्भातील अकराही जिल्ह्यांचा भार आहे. राज्यभरात कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, लॅबमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संधिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल मिळण्यास अडचणी जात आहेत.
अफवांवर विश्वास ठेऊ नका
वाशिमनंतर अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच अकोल्यातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही केवळ अफवा असून, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, घरातच सुरक्षीत राहा, असे आवाहन देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.