अकोला : गत पंधरवडाभर दुहेरी आकड्याने वाढ झालेल्या कोरोना संसर्गाला शनिवार, १६ मे रोजी किंचितसा ‘बे्रक’ लागला असून, दिवसभरात प्राप्त ९५ अहवालांपैकी केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह, तर तब्बल ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शनिवारचा दिवस अकोलेकरांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. शनिवारी सकाळी ९३ अहवाल निगेटिव्ह आले, तर सायंकाळी दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दोन्ही महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या अनुक्रमे २१ व २२ वर्षाच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी, तर दुसरी मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल, लकडगंज भागातील रहिवासी आहे. ही दिलासादायक बाब असली, तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२० वर गेल्याने आणि आणखी १०३ रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल असल्याने धोका कायमच आहे.पश्चिम विदर्भात सर्वाधिक कोरोना रुग्ण अकोल्यात असून, नागपूरनंतर विदर्भात अकोल्याचा दुसरा क्रमांक लागतो. सहा एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या अकोल्यात दीड महिन्यातच दोनशेचा टप्पा ओलांडून कोरोनाबाधितांची संख्या १५ मे पर्यंत २१८ वर गेली असून, मृतकांचा आकडाही १६ झाला आहे. या पृष्ठभूमीवर शनिवार, १ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून ९५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामधील केवळ दोन पॉझिटिव्ह तर उर्वरित ९३ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. आणखी काही अहवाल प्रलंबित असल्याने सायंकाळच्या अहवालाकडे अकोलेकरांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत एकूण २१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवार व शुक्रवारी आणखी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूचा आकडा हा १७ असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. आतापर्यंत एकूण १०० जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात १०३ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू देण्यात आली.