अकाेला : महापालिकेतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार, ८ एप्रिल राेजी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तक्रारकर्ते विधान परिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया, अनिकेत तटकरे, निलय नाईक यांचा समावेश आहे. या समितीला दाेन महिन्यांच्या कालावधीत चाैकशी अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे तक्रारी केल्या. केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानामधील भूमिगत गटार याेजनेचे काम नियमबाह्यरीत्या सुरू असल्याचे तक्रारीत नमूद हाेते. त्यावेळी तत्कालीन पर्यावरणमंत्री ना.रामदास कदम यांनी सदर याेजनेच्या कामाला स्थगिती दिली हाेती. हा स्थगनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उठविला हाेता. यासाेबतच शहरातील निकृष्ट सिमेंट रस्ते, फोर-जी प्रकरण, शासनाकडून प्राप्त अनुदानाचा गैरवापर, पंतप्रधान आवास योजना, तसेच १२व्या व १३व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आ.बाजाेरियांनी शासनाकडे लावून धरली हाेती. या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष उपसमिती गठीत केली आहे. उपसमितीने महापालिकेस भेट देऊन प्रकल्पांची पाहणी करणे यासह संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष नाेंदविण्याचा समावेश आहे.