लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पाम तेल व दूध पावडरची भेसळ करून बनविलेल्या ६८0 किलोची निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी जप्त केला. जप्त केलेल्या मिठाईच्या साठ्याची किंमत १ लाख १७00 रुपये आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांना हरिपेठेतील एका घरामध्ये निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा साठा दडवून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हरिपेठेतील हनुमान मंदिराजवळील आरोपी शुभम श्यामशरण पांडे याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरात राधाकृष्ण बँ्रड नावाने इंडियन मिल्क स्वीट मिठाईचे पाकिटे आढळून आली.विशेष म्हणजे, ही मिठाई खव्यापासून न बनविता, पाम तेल व दूध पावडरची भेसळ तयार करून बनविण्यात आल्याची माहिती आरोपी शुभम पांडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना दिली. हे भेसळ केलेले पदार्थ आरोपी शहरातील स्वीट मार्ट व्यावसायिकांना मावा म्हणून विक्री करीत होता. आतापर्यंत त्याने हजारो किलो ही बनावट मावा व्यावसायिकांना विकला आहे. त्याच्याकडील मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीकडून १ लाख १७00 रुपये किमतीची बनावट मिठाई जप्त करण्यात आली आहे. जागो ग्राहक जागो...
- दिवाळी उत्सवादरम्यान अनेक स्वीट मार्ट व्यावसायिक बनावट खव्याचा वापर करून मिठाई तयार करतात आणि विकतात. रासायनिक प्रक्रिया, रंगांचा आणि दूध पावडरचा वापर करून बनावट खवा तयार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.
- दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईला मोठी मागणी असते. या मिठाईसाठी लागणारा खवा कमी पडतो. म्हणून बनावट खव्याचा वापर मिठाईत केला जातो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून, दूधापासून तयार करण्यात आलेल्या खव्याची दर्जेदार मिठाईच खरेदी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त लोभसिंग राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, गजानन गोरे, सहायक नरवणे यांनी केले.