शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायम, अद्याप तारीख नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:12 PM2019-02-16T13:12:28+5:302019-02-16T13:12:33+5:30
अकोला: गत काही महिन्यांपासून राज्यात शिक्षक भरती सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाद्वारे बिंदु नामावली अद्ययावत करण्यात आली.
अकोला: गत काही महिन्यांपासून राज्यात शिक्षक भरती सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाद्वारे बिंदु नामावली अद्ययावत करण्यात आली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करून लवकर शिक्षक भरतीला सुरुवात करण्यात येणार होती; परंतु अद्यापपर्यंत शिक्षक भरतीची शासनाने तारीख जाहीर न केल्यामुळे शिक्षकांमध्ये भरतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे; मात्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरती होणारच, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील २0 हजार रिक्त पदांसाठी शासनाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भरती घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून, पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांची बिंदु नामावली, रिक्त पदे, जातीचा संवर्ग अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थांची बिंदु नामावली शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयांकडे पाठविण्यात आली होती. या संस्थांची बिंदु नामावली सर्व शिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठविली होती; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे शिक्षक भरती होईल की नाही, याबाबत पात्र शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे युती शासन बेरोजगार शिक्षकांना शिक्षक भरतीचे गाजर तर दाखवित नाही ना! अशी भीती शिक्षकांना वाटत आहे. त्यामुळे शासनाने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरतीची तारीख निश्चित करून तातडीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शासनाने १0 टक्के आरक्षणाचे परिपत्रक आताच काढले आहेत. त्यामुळे १0 टक्के आरक्षणानुसार शिक्षण संस्थांचे रोष्टर पवित्र पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरती सुरू करणार असल्याचेही सोळंकी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पात्र शिक्षकांनी निश्ंिचत असावे. भरतीच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावर तयारी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गत आठवड्यातच शासनाने १0 टक्के आरक्षणाचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे थोडा उशीर लागत आहे; परंतु शिक्षक भरती होणारच.
-विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त.