शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधन वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने, शिक्षक, प्राध्यापक वर्गात संताप व्यक्त होत आहे. ठरवून दिलेल्या निकषानुसार एका इनव्हिजीलेटरच्या नियंत्रणाखाली ०६ विद्यार्थी देण्याची अट असताना काही केंद्रांवर निकषाचे पालन करण्यात आले नाही. मानधन वाचविण्यासाठी दुप्पट, तिप्पट विद्यार्थी देण्यात आले तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना मास्क, सॅनिटायझर, पाणीसुद्धा पुरविण्यात आले नाही. दिवसभर आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर एनटीएने ठरवून दिलेली मानधनाची रक्कम न देता, त्यामधे विविध केंद्रांवर मानधन वाटपात घोळ करून शिक्षक, प्राध्यापकांना कमी मानधन देण्यात आले. त्यामुळे या घोळामागील सूत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षक संघटनांनी सुद्धा या प्रकाराची दखल घेतली असून त्यांनी तक्रार संबंधित यंत्रणा व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यात दोषींवर कठोर कारवाई करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची सुद्धा मागणी होत आहे.
पैसे वाचविण्यासाठी अशीही शक्कल
नीट परीक्षेकरिता काही केंद्रांवर सकाळी ८.३० पासून तर काही केंद्रांवर सकाळी ११ पासून सायंकाळी ६ पर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश होते. पर्यवेक्षकांना देण्यात आलेल्या मानधन वाटपामधे विविध केंद्रांवर घोळ घालण्यात आला. काही केंद्रावर ०६ विद्यार्थी करिता एका पर्यवेक्षकाला १७५० रुपये मानधन वितरित करण्यात आले तर काही केंद्रावर १२ विद्यार्थी असून सुद्धा एक हजार रुपये, तर काही ठिकाणी १२०० रुपये देण्यात आले. काही मोजक्याच केंद्रावर नियमानूसार ०६ विद्यार्थ्यांमागे एका पर्यवेक्षकाला २३०० रुपये मानधन देण्यात आले आहे. ही तफावत का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
रोख मानधन कसे देण्यात आले?
परीक्षेत कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई यांना आरटीजीएस किंवा धनादेशाने मानधन अदा करण्याचे एनटीएचे निर्देश असताना सुद्धा अनेक केंद्रांवर त्याकडे दुर्लक्ष करून रोख मानधन अदा करण्यात आल्याने नियमाचा भंग करण्यात आल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
मी जरी नीट परीक्षेची नियंत्रक असले तरी शिक्षकांच्या मानधनाचा विषय माझ्या अख्त्यारित नाही. एनटीएने संबंधित परीक्ष केंद्र असलेल्या महाविद्यालये, त्यांच्या प्राचार्यांच्या अकाऊंटवर हे मानधन जमा केले. त्यामुळे त्यांनी मानधन किती दिले याची मला माहिती नाही.
-नीता तलरेजा, नीट परीक्षा नियंत्रक