मृतदेह हरविल्याने सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 05:26 PM2021-04-10T17:26:14+5:302021-04-10T17:26:21+5:30
Akola GMC News : कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णाचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईक शांत झाले.
अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील शवगृहात ठेवलेला कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह सापडत नसल्याने शनिवारी नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ केला. यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णाचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईक शांत झाले. बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी एका व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला. शनिवारी रुग्णाचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक आले असता येथे त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, मात्र येथील कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केल्यानंतर काही वेळात मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.