अकोला- काँग्रेसच्या कार्यकाळात गोर-गरिबांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्यात. या योजनांवर झालेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश आल्याची कबुली देत मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, असा इशारा काँग्रेसच्या योजना संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी बुधवारी अकोला येथे दिला. काँग्रेसच्या संनियंत्रण समितीची सभा अकोला येथे न्यू राधाकिशन प्लॉटमधील अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. जनहितासाठी योजनांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. त्यानंतर विनायकराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विदर्भ आणि मराठवाड्यातील जनसेवकांची डिसेंबरमध्ये सभा आयोजित केली असल्याची माहिती दिली. त्यासाठी विदर्भात बुधवारपासून जिल्हानिहाय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेला खोटी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू असलेल्या योजनांची नावे बदलून आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळणार नाही, अशा पद्धतीने योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिष्यवृत्तीचे नियम बदल्याने ओबीसी विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विरोधासाठी विरोध नसून, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेले लोक इतिहासाची चाक उलटी फिरविण्याचा प्रयत्न करून लोकांची फसवणूक करीत आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आता सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमरावती विभागाचे प्रभारी श्याम उमाळकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, अनंत बगाडे, कपिल रावदेव, राजेंद्र कोळकर, महेश गणगणे, उषा विरक, वर्षा बडगुजर, आलमगीर खान आदींची उपस्थिती होती.
केलेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश!
By admin | Published: October 15, 2015 1:01 AM