काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:01 AM2019-12-21T11:01:36+5:302019-12-21T11:01:41+5:30

महाविकास आघाडी झाली नाही तरी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस एकत्रितरीत्या आघाडीमध्ये निवडणूक लढतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Congress-Ncp coliation confirm: shivsena decision today | काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय!

काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या सदस्य निवडीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करण्याबाबत अनुकूलता दाखविली आहे. या तिन्ही पक्षांमधील जागा वाटपावरून वाद उत्पन्न झाल्यास महाविकास आघाडीची निर्मिती धोक्यात येऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता महाविकास आघाडी झाली नाही तरी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस एकत्रितरीत्या आघाडीमध्ये निवडणूक लढतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने ती कमी करण्याच्या मागणीसाठी आधी उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गत वर्षभरापासून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकीवरील स्थगितीचे सावट दूर झाल्याने दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा स्तरावरही करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी गठित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, आघाडी व्हावी, यावर एकमत झाले होते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल व राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान आपापल्या प्रदेशाध्यक्षांना जिल्ह्यातील स्थितीचा आढावा दिला होता. या दोन्ही जिल्हाध्यक्षांना महाविकास आघाडीला प्राधान्य देत जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा, असे सूचित केल्याची माहिती आहे.

काँग्रेस-राकाँचा २७-२५ चा फॉर्म्युला

५३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ४ व राष्टÑवादीचे २ सदस्य विजयी झाले होते. यावेळी हे दोन्ही पक्ष आघाडी करण्याबाबत ठाम असून, काँग्रेस २७ व राष्टÑवादी २५ जागांवर निवडणूक लढविणार असून, एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत करायची असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा फॉर्म्युला ठरविण्यात आला असला तरी शिवसेनेसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असून, शिवसेना महाविकास आघाडी समाविष्ट झाल्यास जागा वाटपासाठी सर्व पर्याय खुले ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मित्रपक्षांची इच्छा असेल तर सोबत घ्या!- खा. सावंत
जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी एकदिलाने कामाला लागण्याची गरज आहे.
या निवडणुकीत मित्रपक्षांची साथ देण्याची इच्छा असेल, तर त्यांना सोबत घ्या. वेळ घालवू नका, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडीच्या संदर्भात सूतोवाच केले. शनिवारी आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.


शिवसेनेसोबत आज चर्चा
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय शनिवार, २१ डिसेंबर रोजी करावा लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची शनिवारी बैठक होत असून, या बैठकीवरच महाविकास आघाडीचे भविष्य ठरणार आहे.

 

 

Web Title: Congress-Ncp coliation confirm: shivsena decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.