एकत्रित वीज बिल; महावितरण म्हणते भुर्दंड नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:03 PM2020-06-22T12:03:21+5:302020-06-22T12:03:56+5:30
ग्राहकांनी वीज बिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अकोला : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीज वापराचे प्रत्यक्ष रिडिंग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल स्लॅब बेनिफिटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडिंग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडिंग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यात आले. १ जूनपासून मीटर रिडिंग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मीटर रिडिंग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीज ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीज बिल एकत्रित पाठविण्यात येत आहे.
१ एप्रिलपासून नवे वीज दर
वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीज बिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीज वापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती; मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीज वापर व १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीज दर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीज बिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.
लिंकवर करा पडताळणी
दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीज वापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीज दर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.