अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये बांधकामाचा व्यवसाय बंद पडल्याने, बेरोजगार झालेल्या शहरातील एका बांधकाम कारागिराने नवा पर्याय शोधत आॅटोमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.अकोला शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील पंचशील नगर येथील रहिवासी विशाल तिवारी यांचा बांधकाम कारागिरीचा (बांधकाम मिस्त्री) व्यवसाय आहे; परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसाय बंद पडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या बांधकाम कारागिरांनी नवा पर्याय शोधत घरी उपलब्ध असलेल्या आॅटोमध्ये भाजीपाला ठेवून घरानजीक असलेल्या न्यू तापडिया नगर भागातील चौकात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. विशाल तिवारी व त्यांचा भाऊ विजय तिवारी हे दोघे भाऊ आॅटोमध्ये भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. या व्यवसायातून दर दिवशी सकाळपासून दुपारी १२ वाजतापर्यंत २५० ते ३५० रुपयांची कमाई होत असल्याचे विशाल तिवारी यांनी सांगितले.