बांधकाम मजुरांनी काढला ‘पुंगी बजाओ’ मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:34 AM2020-01-29T10:34:29+5:302020-01-29T10:34:37+5:30
बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन छेडण्यात आले
अकोला : जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव रखडल्याने बांधकाम क्षेत्रातील असंघटित मजुरांसमोर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन छेडण्यात आले.
जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव रखडल्याने, इमारत बांधकामांसाठी वाळू उपलब्ध नसल्याने बांधकामे बंद आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील असंघटित मजुरांसमोर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समस्या निकाली काढण्याच्या मागणीकरिता बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने अकोला शहरातील खुले नाट्यगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन करण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या मोर्चात बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, अब्दुल बशीर अब्दुल मज्जीत, अनिल वाघमारे, मदन वासनिक, सतीश वाघ, सुनील तायडे, रघुनाथ रायबोले, शीला तरोणे, माया तायडे, रेखा गेडाम, ज्योती सावंत, आशा नवलकार, शारदा हिंगणकर, अनुराधा ढिसाळे, गणेश नृपनारायण, गजानन लोखंडे, सिद्धार्थ पाटील, विजय तायडे यांच्यासह जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर सहभागी झाले होते.