अकोट: रमाई घरकुल योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्याची मिळणारी रक्कम देण्यासाठी दाेघांकडून १ हजार रुपयांची लाच स्विकारणारा पंचायत समिती अकोट येथील मानधन तत्वावरील ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एससीबी) अटक केली. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. अकोट तालुक्यातील जऊळखेड येथील ५७ वर्षीय तक्रारदाराच्या काका व पुतण्याला रमाई घरकुल मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील रक्कम लाभार्थींना मिळाली. दुसऱ्या टप्प्याची रक्कम थकीत होती. ही रक्कम देण्यासाठी पंचायत समिती अकोट येथील मानधन तत्त्वावरील ग्रामीण गृह निर्माण अभियंता आरोपी मंगेश सुधाकर वानखडे (२७ रा. खेळकृष्णाजी पंचगव्हाण ता. तेल्हारा) याने १ हजार रुपयांची लाच मागितली. दोघाही लाभार्थींना लाच द्यायची नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) कडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाभार्थींनी रक्कम देण्याची तयारी दर्शविली. दोघांकडून रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी मंगेश वानखडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मेमाणे, पोहवा, अन्वर खान, पो.ना. अरुण इंगोले, पोकॉ. श्रीकृष्ण पळसपगार, पोकॉ. सचिन धात्रक यांनी केली.
हजार रुपयांची लाच स्वीकारणारा कंत्राटी अभियंता गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 10:52 AM