लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिपॅटायटिस हा आजार यकृताच्या कार्यावर आघात करत असून, त्याचे पाच प्रकार आहेत. जिल्ह्यात त्यापैकी ‘बी’ तसेच ‘सी’ या प्रकाराचे रुग्ण असून, त्याचे योग्य वेळी निदान झाल्यास तो नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. तर ‘हिपॅटायटिस सी’ हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, यकृताच्या कार्यावर आघात करणाऱ्या हिपॅटायटिस या आजाराचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार पडतात. त्यापैकी जिल्ह्यात विशेषत: हिपॅटायटिस बी व हिपॅटायटिस सी आजाराचे रुग्ण आढळून येत असून, त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. हिपॅटायटिस बी हा प्रामुख्याने दूषित रक्त शरीरात गेल्यास होतो. हिपॅटायटिसची वैद्यकीय चाचण्या व उपचारादरम्यान दूषित रक्ताशी संबंध आल्यास होण्याची शक्यता असते. आजाराची गंभीरता लक्षात घेता लिव्हर सुजण्याची शक्यता असते. यामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो. तीव्र आजाराचे रूपांतर लिव्हर सिरॉसिस आणि कॅन्सरमध्ये होऊ शकते. त्यामुळे उपचाराला प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर सांगतात. हेल्थ केअर वर्कर आणि हाय रिस्क गृपमधील रुग्णांची तपासणी करणे, रुग्णांचे निदान व उपचार करणे, संक्रमण थांबविणे, समुपदेशन करणे, लसीकरण व औषधोपचार करणे इत्याची बाबत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम करण्यात येत असल्याची माहिती तंत्रज्ञ अंजली पटले यांनी दिली.सौम्य आणि तीव्र स्वरूपआजाराच्या सौम्य स्वरूपात अचानक यकृताला सूज येते. सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येऊ शकतो. प्रामुख्याने हिपॅटायटिस ‘ए’ हा सौम्य प्रकार आहे. तर तीव्र स्वरूपाच्या आजारात यकृताचा कॅन्सर, यकृत निकामी झाल्याने मृत्यू होणे याचे प्रमाण अधिक असते.
ही आहेत लक्षणेमळमळ- उलट्या होणे, भूक न लागणे, मूत्राचा रंग गडद होणे, थकवा, कावीळ, सांधेदुखी, ओटीपोटात दुखणे, खाज येणे, वजन घटणे आदी हिपॅटायटिसची लक्षणे आहेत.
हिपॅटायटिस जडण्याची कारणे
- आरोग्य सेवा केंद्रात रक्ताशी संपर्क येणे
- शल्यचिकित्सक, परिचारिका, दंतवैद्य आदींना धोका होण्याची शक्यता असते. ४दूषित रक्त चढवणे.
- एका संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित समागम
- अमली पदार्थांचे सेवन करताना एक सुई अनेकांनी वापरणे
- संक्रमित अनुकुचीदार साहित्याने त्वचेवर गोंदणे
- संक्रमित आईपासून प्रसूतीच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच बाळाला विषाणूची लागण होऊ शकते.