अकोला : गत काही महिन्यांपासून हैदोस घालणाऱ्या कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, जिल्हावासीयांसाठी बुधवार (९ जून) खऱ्या अर्थाने दिलासा देणारा दिवस ठरला. बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर दुसरीकडे २,४५२ चाचण्यांमध्ये (११३७ आरटीपीसीआर व १३१५ रॅपिड ॲन्टिजेन ) केवळ ७३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. दरम्यान, २६९ जणांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाबही आज समोर आली.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून सुरु झालेल्या दुसर्या लाटेने अकोला जिल्ह्यात अक्षरश: धुमाकुळ घातला. या लाटेत हजारो नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर शेकडो जण मृत्यूमुखी पडले. मे महिन्याच्या उत्तरार्धात ही लाट ओसरत असून, दैनंदिन ५०० ते ७०० घरात येणारा रुग्णसंख्येचा आकडा आता शंभरच्याही खाली आला आहे. गत २४ तासात आरटीपीसीआर चाचण्यांचे ११३७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे १३१५ असे एकूण २,४५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४० व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३३ असे केवळ ७३ जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित २,३७९ जण निगेटिव्ह आले आहेत.
२६९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, खासगी रुग्णालयांमधील ११, तर होम आयसोलेशन मधील २४० अशा एकूण २६९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२,१२७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,८७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५३,६४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,१२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.