कोरोना : लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:12 AM2021-02-22T04:12:59+5:302021-02-22T04:12:59+5:30
अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ ...
अकोला : कोविड लस घेतल्याने आता कोरोनापासून सुटका झाली, अशी अनेकांची मानसिकता झाली आहे; मात्र लसीच्या दोन्ही डोसचा ४५ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत बेफिकिरी बाळगल्यास कोरोनाचा धोका निश्चितच आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात गत महिन्यापासून कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकजण निर्धास्त झाले. आता आपण सुरक्षित आहोत, आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, या आविर्भावावत अनेकजण होते. मात्र दरम्यानच्या काळात काही लोकांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे लस असुरक्षित आहे का, असा प्रश्नही अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. परंतु, तज्ज्ञांच्या मते कोविडवरील ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर बाळगलेल्या बेफिकिरीमुळे काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लस ही दोन डोसमध्ये घ्यावी लागते. या दोन्ही डोसांदरम्यानचा ४५ दिवसांचा कालावधी हा महत्त्वाचा असतो. याच कालावधीत लसीच्या लाभार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. परंतु, अनेकजण निर्धास्त होऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही किमान २० दिवस विशेष खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
दोन डोसनंतरच वाढतील ॲन्टिबॉडीज
कोरोनावरील लस ही प्रामुख्याने शरीरातील ॲन्टिबॉडीज वाढविण्याचे काम करते. त्यासाठी जवळपास ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लस घेतल्यावरही नागरिकांनी गाफील न राहता विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
मास्क लावा, सुरक्षित राहा
कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही प्रमाणात धोका कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह लस घेतलेल्या प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित झालो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. लस ही सुरक्षित आहे. लसीकरणातील ४५ दिवस महत्त्वाचे आहेत, मात्र त्यानंतरही प्रत्येकाने त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाच्याच सहभागाची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ