अकोला : कोरोना संसर्गाचा आलेख आता घसरला असून, रविवार, ४ जुलै रोजी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये चार, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सहा असे एकूण १० नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७६३० वर पोहोचली आहे. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, त्यामुळे रविवार दिलासा देणारा ठरला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण ३६२ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. अकोट येथील दोघांसह, मुर्तीजापू व अकोला शहरातील प्रत्येकी एक अशा एकूण चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित ३५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी करण्यात आलेल्या ७४७ रॅपिड चाचण्यांमध्ये केवळ सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
३० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील १३ अशा एकूण ३० जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२४५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७, ६३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,२५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.