- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या चीनमधीलकोरोना व्हायरसने जग हादरले आहे. त्याचा परिणाम आता भारतातील विविध क्षेत्रावर जाणवू लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची खेळणी आणि वस्तूंची आयात महिन्याभरापासून बंद झाली. त्यामुळे अकोल्यातून दर महिन्याला होणारी २० कोटींची उलाढाल अचानक ठप्प पडली आहे.भारतातील कोणताही सण किंवा उत्सव असो, त्याकरिता लागणारे साहित्य, वस्तू, मूर्ती आणि लहान मुलांची खेळणी यासाठी चिनी उत्पादनाला पसंती दिली जाते. प्लास्टिक निर्मित या वस्तू सुरेख आणि स्वस्त असल्याने अल्पावधीतच भारतातील बाजारपेठेवर चीनने ताबा मिळविला.त्यातल्या त्यात लहान मुलांच्या खेळणीत चीनने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. चीनची खेळणी जगभरात प्रसिद्ध आहे. अकोल्यातही चीनच्या खेळणीला मोठी मागणी आहे. मुंबई आणि नागपुरातून अकोल्यात चिनी वस्तू येतात व येथे १० मोठ्या वितरकांच्या माध्यमातून शहरातील ४०० विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत त्या पोहोचतात. यावर दर महिन्याला २० कोटींची उलाढाल होते; मात्र जानेवारीच्या प्रारंभापासून चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.शेकडो जण मृत्युमुखी पडले असून, हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली. चीनमधील अनेक शहरांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, तेथील उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. यामध्ये खेळणीच्या निर्मितीच्या कारखान्यांचाही समावेश आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भारत सरकारने हवाई आणि जहाज मार्गाने होणारी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे चीनमधून येणाºया खेळण्यांची आवक थांबली आहे. जवळपास एक महिन्यापासून चीनची आयात बंद झाल्याने भारतातील उलाढाल ठप्प पडली आहे. मुंबई, नागपूर आणि अकोल्यातील स्टॉकिस्टकडे असलेल्या खेळणी आणि वस्तूंचे भाव ३५ ते ४० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. खेळणीला मागणी कायम असल्याने महागड्या भावातदेखील खेळणी विकल्या जात आहे. स्टॉक संपुष्टात आल्यानंतर मात्र भारतीय खेळणीशिवाय पर्याय नसणार आहे.
कोरोना : चिनी खेळण्यांची २० कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:49 PM