वृद्धांसाठी कोरोना ठरतोय ‘किलर’; ७१ टक्के बळी ६० पेक्षा अधिक वयाचे
By atul.jaiswal | Published: September 15, 2020 11:00 AM2020-09-15T11:00:07+5:302020-09-15T11:16:31+5:30
सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.
- अतुल जयस्वाल
अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने सर्वच वयोगटातील लोकांना कवेत घेतले असले, तरी वयोवृद्धांसाठी हा संसर्गजन्य आजार जीवघेणा ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.
एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावला असून, दररोज शंभरपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सद्यस्थितीत ११७३ पेक्षा अधिक अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश आहे. कोरोनाने आतापर्यंत घेतलेल्या एकूण १८६ बळींपैकी ३४ बळी हे सप्टेंबर महिन्यातील आहेत. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांतील कोरोनाबळींच्या संख्येचे विश्लेषण केले असता, यापैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील १४ तर ७० ते ८० वयोगटातील ११ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे तरुणांचाही मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत; परंतु हे प्रमाण नगन्य आहे. या कालावधीत ३० ते ४० या वयोगटातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० ते ५० या वयोगटातील केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये झाला आहे.
नऊ पैकी सात महिला ५० पेक्षा अधिक वयाच्या
सप्टेंबर महिन्यात १४ तारखेपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण ३४ जणांमध्ये नऊ महिलांचाही समावेश आहे. या महिला विविध वयोगटातील आहेत. यापैकी दोन महिला या ४० पेक्षा कमी वयाच्या , तर इतर सात महिला या ५० ते ७० या वयोगटातील असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
आजार गंभीर झाल्यावर उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंगावर दुखणे काढल्यामुळे आजार बळावतो. त्यानंतर अशा रुग्णांना वाचविणे कठीण होते. नागरिकांनी कुठलेही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळून प्राण वाचू शकतात.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.