अकोला : गत सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागले आहेत. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे नैराश्यामध्ये वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक विचार करून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या चिंतेत अनेक नकारात्मक विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे नैराश्याचे वातावरण निर्माण होत असून, त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या शिवाय, समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीच्या आधारावर विविध घरगुती प्रयोग करतात. त्याचेही दुष्परिणाम दिसू लागतात. अशा परिस्थितीत मानसिक स्वस्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.असे जपा मानिसक आरोग्य
- चुकीच्या माहितीपासून सावध राहा
- खात्रीशीर माध्यमांवरूनच कोरोनाविषयी माहिती घ्या
- काळजी वाढविणाऱ्या गोष्टींमध्ये मर्यादित वेळ घालवा
- सोशल मीडियापासून ब्रेक
- कोरोनाविषयी अपडेट राहणे आवश्यक आहे; मात्र खात्रीशीर स्रोतांवरच विश्वास ठेवा
- चुकीची माहिती देणारे अकाउंट्स, हॅशटॅग्स वा फिरणारे मेसेजेस यापासून दूर राहा
- सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवर वेगळे काहीतरी बघा
- किंवा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा
आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी हे करा!जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणे हा देखील आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, कोविडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. अॅक्टिव्ह राहावे ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावे, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावे. ब्रेन एक्सरसाइज करावेत, जेणेकरून स्मृती वाढविण्यास मदत होईल.
कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होत आहे. यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करावा. कोरोनापासून बचावासाठी खबरदारी तर घ्यावी; पण चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाता सकारात्मक विचार आणि सकस आहार घ्यावा.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला