कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, खाटांची कमतरता पडू नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:26+5:302021-04-23T04:20:26+5:30
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे सांगत, जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, ...
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे सांगत, जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि खाटांची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा व आरोग्य प्रशासनाला गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कोरोना उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संचारबंदी घोषित करण्यात आली असून, संचारबंदीच्या या काळात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेतला. त्यामध्ये जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, कोरोनाबाधित रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा, रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली.
अकोट, बाळापूर, तेल्हारा येथे
कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर व तेल्हारा येथे कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तसेच ३० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत दिल्या.
पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर
फिरु नयेत; मनपाला निर्देश!
अकोला शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाहीत, यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
.....................फोटो............