- अतुल जयस्वाल अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात कोविड समर्पित रुग्णालये व कोविड केअर सेंटर्समध्ये २६०० पेक्षा अधिक खाटांची व्यवस्था असली, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांसाठी राखीव सर्व ४५० खाटा सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ‘वेटिंग’वर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोविड समर्पित दोन खासगी रुग्णालयांमध्येही हीच स्थिती असल्याने लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना कुठे ठेवावे, असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनही हतबल झाले आहे.अकोला जिल्ह्यात कोरोना चौखुर उधळत असून, आतापर्यंत ५,३०० पेक्षा अधिक लोकांना या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. सध्या १,१४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांसाठी तालुकास्तरावरही व्यवस्था असली तरी, रुग्णांचा भार एकट्या सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. एकूण ७५० खाटांची क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ४५० खाटा राखीव असून, यापैकी ४३७ खाटा आॅक्सिजन सपोर्टेड आहेत. याशिवाय अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) ६० खाटा व ८३ व्हेंटिलेटर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. एवढी सज्जता असतानाही गत काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील खाटा अपुºया पडत आहेत. कोविड राखीव खाटांपैकी जवळपास २०० खाटा संशयित रुग्णांसाठी असून, उर्वरित खाटा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आहेत. तथापि, सध्या लक्षणे असलेले रुग्ण वाढल्यामुळे या सर्व खाटा व्यस्त आहेत. गंभीर अवस्थेत येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना थेट आॅक्सिजन बेड देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सध्या सर्व ४५० खाटा व्यस्त असून, आठ ते दहा रुग्ण खाटांसाठी प्रतीक्षेत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. कोविड रुग्णांसाठी शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १६ खाटा राखीव असून, या ठिकाणीही सर्व खाटा व्यस्त असल्याची माहिती आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध असल्या तरी, लक्षणे असलेल्या रुग्णांना सर्वोपचारमध्ये प्रतीक्षाच करावी लागत आहे.
अपुºया मनुष्यबळावर कसरतसर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरपासून ते परिचरापर्यंतच्या सर्वच पदांची कमतरता आहे. डॉक्टर, स्टाफ नर्सची अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. उपलब्ध मनुष्यबळावर कोरोना रुग्णांकडे लक्ष द्यावे, की बिगर कोरोना रुग्णांची शुश्रूषा करावी, असा प्रश्न जीएमसी प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे नॉन कोविडच्या बाह्यरुग्ण विभागात केवळ गंभीर रुग्णांनाच घेतले जात असून, इतरांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे.सध्या लक्षणे असलेले व गंभीर स्थितीत येणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने त्यांना थेट आॅक्सिजन सपोर्टेड बेड द्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात सर्व खाटा व्यस्त आहेत. आज रोजी आठ रुग्ण प्रतिक्षेत आहेत.नागरिकांनी दुखणे अंगावर न काढता, थोडी लक्षणे जाणवल्यावर तपासणी करून घ्यावी व रुग्णालयात दाखल व्हावे. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.