कोरोनाच्या तणावात आरोग्य यंत्रणा झाली बळकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:09 AM2021-03-24T11:09:08+5:302021-03-24T11:09:17+5:30
Akola GMC कोरोना काळातील हे बदल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयासाठी नवसंजीवनी देणारे ठरले.
अकोला : गत वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर जवळपास सर्वच क्षेत्र ठप्प पडले होते, मात्र आरोग्य यंत्रणा निरंतर कार्यरत होती. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेतील उणिवा समोर येऊ लागल्याने यंत्रणेवरील ताणही वाढू लागला, मात्र याच खडतर प्रवासात आरोग्य यंत्रणा बळकटही झाली. सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग असो, वा ऑक्सिजनची समस्याने नेहमीसाठी निकाली लागली. प्रलंबित व्हीआरडीएल लॅब, प्लाझ्मा युनिट सुरू झाले, परंतु मनुष्यबळाचा प्रश्न कायमच आहे. कोरोना काळातील हे बदल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयासाठी नवसंजीवनी देणारे ठरले.
‘व्हीआरडीएल लॅब’
जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित व्हीआरडीएल लॅब कोरोनाच्या निमित्ताने अखेर सुरू झाली. ही लॅब प्रामुख्याने स्वाइन फ्लूसाठी प्रस्तावित होती. लॅब सुरू झाल्याने आता कोविडसह स्वाइन फ्लू आणि विषाणूजन्य आजारांचे निदान आता अकोल्यातच शक्य झाले आहे.
प्लाझ्मा युनिट कार्यन्वित
कोविडच्या रुग्णांवर अँटिबॉडीजच्या माध्यमातून उपचार करता यावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत प्लाझ्मा फोरेसिस युनिट सुरू करण्यात आले. प्लाझ्मा संकलनासाठी १३ लाख ४० हजार रुपयांची अत्याधुनिक मशीन मिळाली.
सुपरस्पेशालिटीच्या पदांना मंजुरी
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणेही दाखल झाले आहेत. मात्र, पदनिर्मिती आणि पदभरतीमुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची प्रतीक्षा होती. कोरोना काळात राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ८०० पदांना मंजुरी दिली. त्यामुळे अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला, मात्र त्या पदांच्या भरती प्रक्रियेची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.
आरोग्य यंत्रणेला हे मिळाले
ऑक्सिजन टँक
७१ व्हेंटिलेटर
पीजी सीट ( नेत्ररोग, स्कीन, स्त्री रोग)
व्हीआरडीएल लॅब
प्लाझ्मा सेंटर
शवविच्छेदन गृहाच्या नव्या इमारतीसाठी निधी मंजूर
टेली आयसीयू