अकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण शहरातील बैदपुरा व दुसरा रुग्ण अकोट फैल परिसरात आढळून आल्यानंतर जीव धोक्यात घालून सर्वेक्षणासाठी सरसावलेल्या महापालिकेच्या पथकांना या भागातील स्थानिक नागरिकांनी घेरून कागदपत्रे फाडल्याची घटना उजेडात आली आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा देत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.संपूर्ण देशात कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तसेच सुज्ञ व सजग नागरिकांच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ७ एप्रिल रोजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा भागातील इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर अवघ्या १८ तासांतच प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या अकोट फैल परिसरात कोरोनाचा दुसरा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला. ही बाब गंभीरतेने घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व अकोट फैल परिसरातील कोरोना बाधित रुग्ण व त्याच्या शेजाऱ्यांच्या घरी तातडीने निर्जंतुकीकरणाचे निर्देश दिले. तसेच संपूर्ण प्रभागात फवारणी सुरू केली. यादरम्यान, घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश देत त्यासाठी कर वसुली लिपिक, शिक्षक व आशा वर्कर यांच्या पथकांचे गठन केले. ८ एप्रिल रोजी दुपारी बैदपुरा परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या मनपाच्या पथकांना स्थानिक रहिवाशांनी घेराव घालून त्यांच्याजवळील कागदपत्रे फाडून टाकल्याची घटना समोर आली.
सर्वेक्षणावर उपस्थित केले प्रश्नकुटुंबात सदस्य किती, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला किरकोळ अथवा गंभीर आजार असेल तर त्यासंदर्भात अर्जात माहिती भरून देण्यासाठी मनपाच्या पथकांनी सूचना केल्या असता, सदर अर्जावरच स्थानिक रहिवाशांनी शंका उपस्थित केल्याची माहिती आहे. ‘एनआरसी’, ‘सीएए’च्या अनुषंगाने अर्ज भरून घेतल्या जात असल्याचा आरोप करीत रहिवाशांनी मनपाच्या पथकांना घेराव घातला.
अखेर पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षणसदर घडलेल्या प्रकाराची मनपाच्या पथकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर याप्रकरणी रात्री पोलीस प्रशासनासोबत संपर्क साधण्यात आला. मनपाच्या सर्वेक्षणाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे. गुरुवारी पोलिसांच्या मदतीने बैदपुरा भागात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.
कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या व्यक्तीच्या परिसरात हा आजार वाढणार नाही, यासाठीच मनपाकडून सर्वेक्षण व पुढील १४ दिवस आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज न ठेवता मनपाला सहकार्य करावे, पथकांना आडकाठी केल्यास नाइलाजाने कठोर कारवाई करावी लागेल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.