अकोला: जिल्ह्यात कोविड लसीकरणाला लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळात असला, तरी सद्यस्थितीत लसीचा साठाच शिल्लक नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील १०३ लसीकरण केंद्र बंद पडल्याची माहिती समोर आली. ज्या ठिकाणी लस उपलब्ध आहे, अशा केवळ ५० केंद्रावर शुक्रवारी लस देण्यात आली, मात्र लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम पुर्णत: खंडित होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अकोला महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील एकूण १५३ केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, मात्र गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात गरजेनुसार लसीचा साठा उपलब्ध उपलब्ध नाही. गुरुवारी जिल्ह्याला कोविशिल्डचे केवळ ३६८० येवढेच डोस उपलब्ध झाले. हे डोस एक दिवस देखील पुरणार नसल्याने आरोग्य विभागाची मोठी पंचाईत झाली. परिणामी शुक्रवारी ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे, अशा ५० ठिकाणीच लसीकरण होऊ शकले, तर उर्वरीत १०३ केंद्रावर कोविड लसीकरण मोहीम खंडीत झाल्याचे चित्र नसल्याने अनेक केंद्रावर लसीकरण होऊ शकले नाही. परिणामी शुक्रवारी जवळपास ५० केंद्रावरच लसीकरण करण्यात आले. तसेच सर्वोपचार रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रामध्ये केवळ दुसऱ्या डोसच्या लाभार्थींनाच लस देण्यात आल्याची माहिती आहे.
९ दिवसांपूर्वीच वाढविले होते ६७ केंद्र
जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाल्याने ६७ कोविड लसीकरण केंद्र वाढविण्यात आले होते. यापूर्वी जिल्ह्यात ८६ केंद्रावर कोविड लसीकरण केंद्र होते. त्यामुळे जिल्ह्यात १५३ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली, मात्र आठ दिवसांतच लसीचा तुटवडा भासल्याने शुक्रवारी १०३ लसीकरण केंद्र बंद पडली.
सद्यस्थितीत उपलब्ध डोस
ग्रामीण भाग - ५००
शहरी भाग - २०००
जीएमसीत केवळ दुसरा डोस
गुरुवारी प्राप्त कोव्हॅक्सिन लस ही केवळ दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना दिला जात असल्याची माहिती आहे. अशा लाभार्थींसाठी सर्वोपचार रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आज बहुतांश केंद्र पडणार बंद
जिल्ह्यात सद्यस्थितीत उपलब्ध साठा एक दिवस पुरेल येवढाही शिल्लक नाही. त्यामुळे शनिवारी काही केंद्र वगळता जिल्ह्यातील उर्वरीत सर्वच केंद्र बंद हाण्याची शक्यता आहे.