अकोला : अकोल्यासह राज्यभरात १८ वर्षांवरील सर्वांसाठीच कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार, जिल्ह्यात बुधवार २३ जूनपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच शासनाने ३० ते ४५ वर्ष वयाेगटातील लाभार्थींच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या कोविड लसीकरणाला सुरुवात केल्यानंतर दोन दिवसांतच १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी सायंकाळी आरोग्य विभागाला मिळाले. त्यानुसार, बुधवार २३ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कोविन संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंगसाठी स्लॉट टाकले जाणार आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील केवळ ६ केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण राहणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील इतर केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातही सुरू होणार लसीकरण
सद्य:स्थितीत केवळ महापालिका कार्यक्षेत्रातच कोविड लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आठवडाभरात ही मोहीम जिल्हाभरात राबविली जाईल. त्या अनुषंगाने प्रारंभी ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये उदासीनता
कोविड लसीकरणासंदर्भात ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळेच कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू होणार असल्याने मंदावलेल्या लसीकरणाची गती वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.