CoronaViru in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, ११ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:16 PM2020-07-08T18:16:20+5:302020-07-08T18:27:02+5:30
मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९७ वर गेली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९७ वर गेली आहे. आज दिवसभरात ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात ३७० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर उर्वरित ३५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्य १३ महिला व पाच पुरुष आहेत. सकाळच्या अहवालात तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव मंजू व पारस येथील प्रत्येकी दोन जण, तर बाळापूर, अकोला शहरातील सातव चौक व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये दोन जण महान येथील, दोन जण अकोट येथील तर उर्वरित धोत्रा ता.मुर्तिजापूर व आदर्श कॉलनी, अकोला येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
६० वर्षीय महिला दगावली
अकोला शहरातील वाशिम बायपास भागातील एका ६० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ९१ वर गेला आहे.
११ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात तर कोविड केअर सेंटर मधून चार अशा ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये दोघे बाळापूर, दोघे अकोट, दोघे दगडी पूल येथील तर उर्वरीत अकोट फैल, आगरवेस, जेल क्वार्टर, सोनटक्के प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
३६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १७९७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३४४ आहे. तर सद्यस्थितीत ३६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.