CoronaVirus : ‘होम क्वारंटीन’मधून १६ मुक्त; १७ जणांवर 'क्वारंटीन'चा स्टॅम्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:54 AM2020-03-20T10:54:54+5:302020-03-20T10:55:03+5:30
१७ जणांच्या हातावर होम क्वारंटीन असल्याचे स्टॅम्प मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अकोला : विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या ४७ जणांची आरोग्य विभागाकडे नोंद असून, त्यापैकी १६ जणांची ‘होम क्वारंटीन’मधून सुटका करण्यात आली आहे. शिवाय, १७ जणांच्या हातावर होम क्वारंटीन असल्याचे स्टॅम्प मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विदेशातून येणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जात आहे. आतापर्यंत विदेशातून आलेल्या ४७ जणांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यापैकी तिघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित बहुतांश व्यक्तींना ‘होम क्वारंटीन’मध्येच ठेवण्यात आले होते. त्यानुसार, या नागरिकांना १४ दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’मध्ये राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या. गुरुवारपर्यंत त्यापैकी १६ व्यक्तींनी हा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांना ‘होम क्वारंटीन’मधून मुक्त करण्यात आले. उर्वरित ३१ जणांना होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले असून, त्यातील १७ जणांच्या हातावर शिक्के मारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
तिघांशी अद्याप संपर्क नाही!
विदेशातून आलेल्या ४७ व्यक्तींशी आरोग्य विभागाचा संपर्क झाला आहे; मात्र याव्यतिरिक्त आणखी तिघांचा संपर्क झालेला नाही. त्या व्यक्तींचा संपर्क क्रमांक लागत नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही व्यक्तींचे पासपोर्ट मागविण्यात येणार असून, त्याआधारे त्यांचा शोध घेणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.