CoronaVirus : पातुरातील ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:19 AM2020-04-14T11:19:40+5:302020-04-14T11:19:58+5:30
शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
शिर्ला/पातूर : पातूरच्या सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० कोरोना संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांपैकी सात जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने हलविण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ४७ पैकी सात पॉझेटिव्ह वगळता ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पातूर कोरोनामुक्त होण्याची प्रतीक्षा शिर्ला व पातूर येथील नागरिकांना आहे. दरम्यान, ३ हजार ९०५ कुटुंबातील २१ हजार २६८ नागरिक यापैकी एकही व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळले नाही. सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून दहशतीखाली वावरत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २१ हजार २६८ नागरिक सर्व सीमा बंद केल्याने होम क्वारंटीन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार थांबला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या थांबविण्यात आरोग्य विभाग, नगर प्रशासन, शिर्ला ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलिसांना यश आले आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुणीही घराबाहेर पडू नका कारण कोरोनाला पातुरातून पळवायचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)