- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्ह्यात १४ व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, एकूण कोरोना संदिग्ध रुग्णांपैकी ७८ रुग्णांना १४ दिवसांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील ज्या रूग्णांचे नमुने दुसऱ्यांदा ‘निगेटिव्ह’ आले आहेत त्यांना गृह अलगीकरणअंतर्गत घरी पाठविण्यात येणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विलगीकरण आणि अलगीकरण असे वेगवेगळे कक्ष तयार केले आहेत. अलगीकरण कक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या कृ षक भवनात तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ७८ संदिग्ध कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले असून, महानगरपालिकेचे डॉ. फारूक यांच्या देखरेखीत या रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी नीलेश अपार हे दररोज येथे भेट देत असून, रुग्णांना दिलासा देत आहेत. गुरुवार, १६ एप्रिल रोजी यातील ३ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच त्यांच्या राहत्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे. शुक्रवारी यातील २ रूग्णांना घरी पाठविण्यात येणार आहे.जेवण व वैद्यकीय सेवायेथे ‘इन्स्टिट्युशल क्वारंटीन’ ठेवण्यात आलेल्या महिला, पुरुष, मुलांना प्रशासनाच्यावतीने दोन वेळचे भरपूर जेवण सकाळचा अल्पोपाहार, ४ वाजता चहा आदीची व्यवस्था करण्यात आली आहे.
कृ षक भवनात जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांना ठेवण्यात आले आहे. शुक्रवारीच ३२ जणांचे पुन्हा ‘स्वॅब’ नमुने घेतले जाणार आहेत. ज्यांना घरी पाठविण्यात येत आहे, त्याच्या हातावर शिक्के व घरावर नोटीस लावली जाणार आहे. ते बरे झाले असले तरी १४ दिवस त्यांनी घरीच राहावे, हा उद्देश आहे.
- नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, अकोला.
रुग्णाची येथे काळजी घेण्यात येत असून, ज्यांना घरी पाठविण्यात येत आहे, ते रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे गावातील नागरिक, शेजाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, रुग्णाने १४ दिवस घराच्या बाहेर पडू नये, हे त्यांना इथे समजावून सांगण्यात आले आहे.- डॉ. फारुख, आरोग्य विभाग, महापालिका, अकोला.