Coronavirus in Akola : जीएमसीत आणखी १८० खाटा होणार आरक्षीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:08 AM2020-04-04T10:08:59+5:302020-04-04T10:11:04+5:30
१८० खाटा कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांची वाढती संख्या चिंताजकन आहे. परिस्थितीशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वोपचार रुग्णालयात आणखी १८० खाटा कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नेत्र व त्वचा वार्ड कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आला आहे.परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, हळूहळू सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटीलेटरचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, खाटांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यापूर्वीच नेत्र व त्वचा विभागातील प्रत्येकी २० खाटांचे दोन वार्ड कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी आरक्षीत करण्यात आला आहे. त्यामध्ये संधिग्ध रुग्णांनाही ठेवण्यात आले आहे. परंतु, गत आठवड्यात दाखल संधिग्ध रुग्णांची संख्यापाहता खाटाही वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार, सवोपचार रुग्णालयात आणखी १८० खाटा आरक्षीत करण्यात येणार असून, आगामी सात दिवसात हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच आगामी काळात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील जवळपास २०० डॉक्टर्स, परिचारीका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही यासाठी मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे.
मुर्तिजापूर येथेही ५० खाटा राखीव
प्रामुख्याने कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातच दाखल केले जाते. परंतु, ग्रामीण भागात रुग्ण आढळल्यास ग्रामीण रुग्णालयातही तशी व्यवस्था आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
चार व्हेंटीलेटरची प्रतीक्षा कायम!
सध्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, रुग्णांची संख्या वाढल्यास व्हेंटीलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे चार नवीन व्हेंटीलेटरची मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतु, अद्यापही नवीन व्हेंटीलेटर प्राप्त झाले नाहीत.