अकोला : गत सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानाने दहशतीत असलेल्या अकोलेकरांसाठी सप्टेंबर महिन्याची अखेर व आॅक्टोबर महिन्याची सुरुवात दिलासा देणारी ठरली आहे. २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या तुलनेत या संसर्गजन्य आजारावर मात करणाºयांचा आकडा दिलासा देणारा आहे. या कालावधीत तब्बल ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३५० नव्या रुग्णांची भर पडली.एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण सापडलेल्या अकोला शहर व जिल्ह्यात नंतरच्या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात तर रुग्णसंख्या दिवसागणिक तिहेरी आकड्याने वाढली. आज रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर १,१०० पेक्षा अधिक रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात घातांकी स्वरूपात रुग्णवाढ झाल्यानंतर या महिन्याचे अखेरचे तीन दिवस व आॅक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन दिवसांत रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. या कालावधीत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये ३५० जण पॉझिटिव्ह आढळून आले. या तुलनेत या पाच दिवसांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, विविध कोविड केअर सेंटर्स, खासगी हॉटेल व रुग्णालये आणि होम क्वारंटीन असलेल्या तब्बल ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.१,११७ अहवाल निगेटिव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये गत पाच दिवसांत एकूण १,४६७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल १,११७ जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर ३५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नसतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होणे, ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.