CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 06:53 PM2020-07-07T18:53:45+5:302020-07-07T18:55:38+5:30
मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली.
अकोला : अकोल्याला बसलेला कोरोनाचा विळखा सैल होण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर अकोला शहरातील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा ९० झाला असून, एकूण बाधितांची संख्या १७७९ वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवारी४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात एकूण १३४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ११८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ७ महिला तर ९ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये कच्ची खोली येथील ५, अकोट येथील तीन, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी एकाही संदिग्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
पातूरच्या रॅपीड टेस्ट मध्ये २१ पॉझिटिव्ह
पातूर येथे ५ व ६ जुलै रोजी रॅपीड टेस्ट मोहिम राबविण्यात आली. या दोन दिवसांत पातूर येथील २१ जण पॉझिटीव्ह आले आहेत. ही रुग्ण संख्या मंगळवारच्याअहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.
५२ वर्षीय महिला दगावली
दरम्यान, खैर महम्मद प्लॉट येथील ५२ वर्षीय महिलेचा मंगळवारी उपचार घेताना मृत्यू झाला. त्यांना २७ जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
४७ जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सकाळी दोघे व दुपारनंतर पाच जणांना अशा सात जणांना तर ४० जणांना कोविड केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या सात जणांपैकी सिंधी कॅम्प येथिल तीन जण, अकोट, गाडगे नगर, हनुमान नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथून घरी सोडण्यात आलेल्या ४० जणांपैकी तारफैल येथील दहा जण, छोटी उमरी, कळंबेश्वर व अकोट येथील प्रत्येकी पाच जण, गजानन नगर येथील चार जण पिंपळखुटा आणि जुने शहर येथील प्रत्येकी दोन जण, मळसुळ, अयोध्या नगर, खदान, गाडगेनगर, कामा प्लॉट, बोरगाव मंजू आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
३५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १७७९ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९० जण (एक आत्महत्या व ८९ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३३३ आहे. तर सद्यस्थितीत ३५६ अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.