लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला, तर ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमधील ३९ अहवाल व्हीआरडीएल लॅबमधील, तर आठ अहवाल रॅपिड टेस्टमधील आहेत. अशातच खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद उशिरा झाल्याने मृत्यूचा आकडा थेट १३१ वर पोहोचला आहे.गत महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर कमी असल्याचे निदर्शनास आले होते; मात्र जिल्ह्यातील काही रुग्णालयांकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद उशिरा करण्यात आल्याने मृत्यूचा आकडा ९ ने वाढला आहे. अशातच गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतकांची एकूण संख्या आता १३१ वर पोहोचली आहे. गुरुवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५२ वर्षीय महिला ही पाचमोरी येथील, तर दुसरा ४७ वर्षीय रुग्ण हा गंगानगर येथील रहिवासी होता. हे दोन्ही रुग्ण १२ आॅगस्ट रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १९ जण, तर उर्वरित हिवरखेड व खिनखिनी, ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये खांबोरा येथील १२ जण, सिव्हिल लाइन येथील दोन जण तर उर्वरित एमराल्ड टॉवर, केळकर हॉस्पिटल, रिधोरा व निमकर्दा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३,१७६ वर पोहोचली आहे. तर २,५१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
म्हणून वाढली मृतकांची संख्याशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत ११४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात १ आणि अकोल्यातील दोन खासगी कोविड रुग्णालयात १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या १७ मृत्यूपैकी केवळ ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र उर्वरित नोंदी गुरुवारी करण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
६० जणांना डिस्चार्जगुरुवारी एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३० जणांना, कोविड केअर सेंटर येथून २२ जण, हॉटेलमधून एक, कोविड केअर सेंटर हेंडज, मूर्तिजापूर येथील सात जणांचा समावेश आहे.