CoronaVirus in Akola एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या १३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:59 AM2020-04-10T09:59:45+5:302020-04-10T17:17:31+5:30
हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना गुरुवारी रात्री उशीरा आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. धक्कादायक बाब म्हणजे हे चौघेही एकाच कुटुंबातील असून, यामध्ये ३ वर्षांची मुलगी, ५ वर्षांच्या मुलासह त्यांची आई आणि एका ३० वर्षीय युवकाचा समावेश आहे. 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अकोला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या १३ वर पाहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे आता अकोला शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ झाली आहे. शहरात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने बैदपुरा परिसर सील करून आरोग्य विभागाने त्याच्या कुटुंबियांना आयसोलेशनमध्ये दाखल केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन स्वॅब चाचणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशीरा या चौघांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बैदपुरा हा परिसर आधिच सील करण्यात आल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या अकोलेकरांची चिंता वाढविणारी आहे.