CoronaVirus in Akola : मृत्युदर वाढताच; रुग्ण ‘व्हेंटिलेटर’च्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:18 AM2020-06-09T10:18:26+5:302020-06-09T10:18:31+5:30
रुग्णाला व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, सोमवारी आणखी एका रुग्णाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे मागणी करूनही प्रशासनाकडून सर्वोपचार रुग्णालयात इतर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.
सध्या जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; मात्र सद्यस्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.
२४ व्हेंटिलेटरचा प्रस्ताव; मिळाले केवळ चारच!
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८२१ वर पोहोचली, तरी अद्याप केवळ चारच व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित २० व्हेंटिलेटर अद्यापही मिळाले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
तीन तास ‘व्हेंटिलेटर’च्या प्रतीक्षा; प्राणज्योत मालवली!
दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेला कारोनाची लक्षणे नव्हती मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्या महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता; पण आयसीयूमध्ये बेड उपलब्ध झाला नाही. तर दुसरीकडे ती महिला रुग्ण मृत्यूशी झुंज देत होती. जवळपास तीन तास सुरू असलेल्या जीवनमृत्यूच्या या संघर्षात व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिला जीव गमवावा लागला. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधनांचा अभाव असल्याने डॉक्टरही हतबल दिसून आले.