CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी सात पॉझिटीव्ह; सातही रुग्ण पातुरचे, रुग्ण संख्या ९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:28 PM2020-04-09T12:28:51+5:302020-04-09T12:36:30+5:30
अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अकोला शहरात शिरकाव केल्यानंतर आता जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, पातुर तालुक्यातील सात संदिग्ध रुग्णांचे अहवाल बुधवारी रात्री उशीरा ‘पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली. अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हे सातही रुग्ण पातुर येथील असून, ते वाशिम जिल्ह्यातील एक कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे अकोला शहरासह पातुर शहरातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत अकोला जिल्हा कोरोनाच्या सावटापासून दुर होता; परंतु मंगळवारी जिल्ह्यातील पहिल्या रुग्णांची नोंद अकोला शहरातील बैदपूरा भागात झाली. त्यानंतर अवघ्या १८ तासांतच अकोट फैल भागातील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा बुधवारी २ झाला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाधीत रुग्ण आढळलेला भाग व लगतचा परिसर सिल केला.
काही दिवसांपूर्वीच वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे कोरोनाचा एक बाधित रुग्ण आढळला होता. हा रुग्ण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतल्यावर पातुर येथील १५ लोकांच्या संपर्कात आला होता. परंतु, त्या रुग्णाचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले पातुरातील १५ जणांनी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. या १५ संदिग्ध रुग्णांना येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे सर्वांचे ‘स्वॅब’ वैद्यकीय चाचणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवातील यातील ७ जणांचे वैद्यकीय चाचचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पातुरकरांची झोप उडाली आहे. इतर संदिग्ध रुग्णांचे अहवाल देखील येणार असून, आरोग्य विभागाचे त्याकडे लक्ष लागून आहे.
पातुरची सीमा सील
पातुरातील सात जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पातुरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून, सकाळीच पातुर शहराची सीमा सील करण्यात आली होती.
कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवाल
अकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८
अहवाल प्राप्त संख्या-१०९
पॉझिटिव्ह -९
निगेटिव्ह-१००