अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर नऊ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८८ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेले तीघेही पुरुष आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन जण कापशी रोड अकोला येथील, तर एक जण पातूर येथील एकाचा समावेश आहे. सायंकाळी एक महिला व पाच पुरुष असे सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये बाभूळगाव येथील दोन जण, तर बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५४ वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, मंगळवारी सकाळी आणखी एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला अकोट तालुक्यातील कावसा येथील असून, त्यांना ८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.२१ जणांना डिस्चार्जमंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून तीन जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून चार जणांना अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५४ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात एक बळी ; ९ पॉझिटिव्ह, २१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 5:57 PM