कोरोनाबळीचे सत्र सुरुच; महिलेचा मृत्यू; तीन नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:19 PM2020-07-28T12:19:08+5:302020-07-28T12:19:31+5:30
मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन नवे पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८२ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेले तीघेही पुरुष आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन जण कापशी रोड अकोला येथील, तर एक जण पातूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
५४ वर्षीय महिला दगावली
कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, मंगळवारी सकाळी आणखी एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला अकोट तालुक्यातील कावसा येथील असून, त्यांना ८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कालपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर मंगळवारी त्यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ वर पोहचला आहे.
३६९ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०१० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३६९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल- ८०
पॉझिटीव्ह- ३
निगेटीव्ह- ७७
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१९०+२९२=२४८२
मयत-१०३
डिस्चार्ज- २०१०
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३६९