CoronaVirus : अकोल्यात आणखी एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ९१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:40 AM2020-07-08T11:40:23+5:302020-07-08T11:43:28+5:30
बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे बळी पडणाऱ्यांची व आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९१ वर गेली आहे.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी एकूण २०९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर उर्वरित १९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्य नऊ महिला व तीन पुरुष आहेत. यापैकी तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव मंजू व पारस येथील प्रत्येकी दोन जण, तर बाळापूर, अकोला शहरातील सातव चौक व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
६० वर्षीय महिला दगावली
अकोला शहरातील वाशिम बायपास भागातील एका ६० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ९१ वर गेला आहे. आतापर्यंत १३३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३६७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.