CoronaVirus : अकोल्यात कोरोनाबाधितांचे शतक; रुग्णसंख्या १०५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:50 AM2020-05-08T10:50:07+5:302020-05-08T10:58:09+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने विक्राळ रुप धारण केले असून, एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्याने शुक्रवार, ८ मे रोजी शंभरचा आकडा पार केला. शुक्रवारी आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालावरून समोर आले आहे.
रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गत आठवड्यात मोठ्या झपाट्याने वाढली आहे. गुरुवार, ७ मे रोजी दिवसभरात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९५ वर, तर अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७० वर गेला होता. त्यामध्ये शुक्रवारी आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाली असून,सद्यस्थितीत ८० जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी सकाळी एकून ८९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत अकोला शहर व त्यातही बैदपुरा हा भाग कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला होता. आता शहरातील विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत असून, उगवा, अंत्री मलकापूर, व पिंजर यासारख्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले असून, ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १० जण कोविड-१९ आजाराने, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.