CoronaVirus : अकोल्यातच होणार ‘कोरोना’ची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:48 AM2020-03-20T10:48:36+5:302020-03-20T10:49:09+5:30
‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’चे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
अकोला : कोरोना संशयितांचे वैद्यकीय नमुने आता अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच तपासले जाणार आहेत. त्यासाठी १५ दिवसांत प्रस्तावित ‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’चे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासन तथा आरोग्य विभागाला दिले.
सध्यातरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह आढळला नाही; परंतु आगामी काळात कोरोनाचा धोका पाहता पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा प्रशासन तथा आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी ‘कोरोना’ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन त्यांनी आरोग्य विभागाला दिले, तसेच येथे प्रस्तावित ‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’ची माहिती त्यांनी घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे लॅबचे निर्माण कार्य प्रलंबित असल्याची माहिती मिळताच कडू यांनी १५ दिवसांत काम पूर्ण करून लॅब सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यांची चाचणी अकोल्यातच होणे शक्य होणार आहे. त्यामुळे विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात होणारी ही दुसरी लॅब आहे.
‘स्वाइन फ्लू’साठी होती लॅब प्रस्तावित!
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता २०१७ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’साठी प्रयत्न केले होते. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेंतर्गत (एनआयव्ही) लॅबला मान्यता मिळाली होती. त्यासाठी जागाही निश्चित केली होती. शिवाय, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे येथील दहा जणांच्या एका पथकाला प्रशिक्षणही दिले होते.
कोरोनाच्या निमित्ताने प्रशासनाला जाग!
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांची पुण्याला बदली झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘व्हीआरडी’ लॅबकडे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी लॅबसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली होती; परंतु लॅबसाठी आवश्यक बांधकाम पूर्ण न केल्याने वैद्यकीय साहित्य बाहेरच पडून होते. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशनच झालेले नाही.