CoronaVirus : लग्न रद्द करून ‘त्या’ डॉक्टरांची ‘कोविड’ वॉर्डात रुग्णसेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:50 AM2020-05-17T09:50:56+5:302020-05-17T09:51:07+5:30

डॉ. श्याम गावंडे व त्यांची भावी पत्नी डॉ. पूजा टोळे हे दोघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

CoronaVirus: Doctors in 'Kovid' ward canceling marriage and prefer Patient service | CoronaVirus : लग्न रद्द करून ‘त्या’ डॉक्टरांची ‘कोविड’ वॉर्डात रुग्णसेवा!

CoronaVirus : लग्न रद्द करून ‘त्या’ डॉक्टरांची ‘कोविड’ वॉर्डात रुग्णसेवा!

Next

- प्रवीण खेते
अकोला : लॉकडाउनच्या काळत अनेकजण विवाह उरकून घेत आहेत. आपणही ‘फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून विवाह उरकून घेऊ, असा विचार करीत डॉ. श्याम गावंडे यांनी १६ मे रोजी लग्नाचा मुहूर्त काढला होता; पण लग्न रद्द करून त्यांनी त्याच दिवशी ‘कोविड’ वॉर्डात रुग्णसेवेला प्रारंभ केला. विशेष म्हणजे, त्यांच्या भावी पत्नी डॉ. पूजा टोळे यांनीदेखील कोरोना कक्षात सेवा दिली आहे.
डॉ. श्याम गावंडे व त्यांची भावी पत्नी डॉ. पूजा टोळे हे दोघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मार्च महिन्यातच कुटुंबीयांनी त्यांचे लग्न जुळवले होते. लग्नाची तारीख १६ मे ठरविण्यात आली; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लग्न होईल की नाही, अशी चिंता दोन्ही कुटुंबीयांना होती; पण याही परिस्थितीत अनेकांनी विवाह उरकून घेतले. असाच शॉर्टकट लग्नसमारंभ आपणही उरकून घेऊ, असा विचार करीत डॉ. गावंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लग्नसमारंभाची परवानगी मागितली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आॅनलाइन परवानगीदेखील मिळाली; पण ऐनवेळी त्यांनी आपले लग्न रद्द करून १६ मेच्या रात्रीपासून ‘कोविड’ वॉर्डमध्ये रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि मर्यादित मनुष्यबळ, अशा परिस्थितीत डॉ. गावंडे यांचे हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून, इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

कुटुंबीयांपासून राहताहेत दूर
आज विवाह पार पडला असता, तर डॉ. गावंडे कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवत असते; पण कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात त्यांनी रुग्णसेवा अन् कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

-शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सर्वच डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. तेच मीदेखील करीत आहे. अकोला कोरोनाविरुद्धचे हे युद्ध निश्चितच जिंकणार, असा विश्वास आहे.
- डॉ. श्याम गावंडे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला.

 

Web Title: CoronaVirus: Doctors in 'Kovid' ward canceling marriage and prefer Patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.