अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर तयार झालेले पदार्थ खाणे टाळणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट अशा व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात जाणवत असून, या व्यवसायामध्ये ९० टक्के घट आली आहे. विशेष म्हणजे खाद्य पदार्थांच्या आॅनलाइन आॅर्डरलाही याचा फटका बसला असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्येसुद्धा ८० टक्के घट झाल्याची माहिती या व्यवसायातील सूत्रांनी दिली.अकोल्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी शॉप, स्वीट मार्ट अशी खाद्यपेय विक्री करणारी लहान-मोठी एक हजारावर दुकाने आहेत. या पैकी १३५ व्यावसायिकांनी खाद्य पेय विक्रेता असोसिएशन स्थापन केली आहे. शहरातील सर्व प्रमुख व्यावसायिक या असोसिएशनचे सदस्य आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारीच या असोसिएशनने बैठक घेऊन ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले तरी ग्राहकांनीच आता हॉटेलिंग थांबविल्याचे चित्र आहे. शनिवार, रविवार हे दोन दिवस तर या व्यवसायासाठी सर्वाधिक व्यवसायाचे दिवस असतात; मात्र गेल्या शनिवारी, रविवारीसुद्धा ग्राहक फिरकले नाहीत. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही ९० टक्क्यांपर्यंत रोडावली असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांनी आॅनलाइन आॅर्डर करून खाद्य पदार्थ मागविणे सुरू केले होते. अकोल्यातही विविध कंपन्यांचे फ्रेंचाईसी म्हणून अनेक हॉटेलची नोंदणी झाली आहे; मात्र हा व्यवसायही आता थंडावला आहे. या व्यवसायावर अंदाजे दहा हजार कामगारांचा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे कोरोनाचा धसका लवकर संपला नाही, तर या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. निवासी हॉटेलच्या खोल्याही खालीचनिवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाउसमधील खोल्याही खालीच आहेत. नवीन आरक्षण नाही आणि ज्यांनी आधी खोल्या आरक्षित केल्या होत्या त्यांनीही आरक्षण रद्द केल्याने या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्यावर सर्वच नागरिकांचा भर आहे. सामाजिक आरोग्यासाठी ती बाब आवश्यकच आहे, त्यामुळे साहजीकच अनेक क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. अकोल्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्याच दिशेने आहे. जे ग्राहक हॉटेलमध्ये येतात त्यांच्या सुरक्षेसाठीची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व व्यावसायिकांना दिल्या आहेत.-योगेश अग्रवाल, अध्यक्ष, खाद्यपेय विक्रेता असोसिएशन, अकोला.