CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू; २९ पॉझिटिव्ह, ६० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 06:12 PM2020-07-25T18:12:03+5:302020-07-25T18:12:38+5:30
जिल्ह्यातील मृतांचा आकडा १०० झाला असून, एकूण रुग्णसंख्या २३८३ वर गेली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच आहे. शनिवार, २५ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर दिवसभरात २९ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १०० झाला असून, एकूण रुग्णसंख्या २३८३ वर गेली आहे. दरम्यान, ६० जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ११ महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या अकोट शहरातील तब्बल १२ जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोल्यातील शास्त्री नगर भागातील दोन, रामनगर भागातील दोन, केशव नगर भागातील दोन जणांसह बाभूळगाव ता. बार्शीटाकळी, जेल क्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पारस व मुर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील प्रत्येकी दोन जण, तर अकोल्यातील मलकापूर भागातील एक अशा पाच जणांचा समावेश आहे.
७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
शनिवारी एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगानगर, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष असून, त्यांना ११जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.
६० जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ४६ जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण तर आयकॉन हॉस्पीटल मधून दोन जणांना अशा एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३७८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १९६६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.