CoronaVirus : रुग्ण ‘कोरोना’मुक्त होताहेत; पण धोक्याची घंटा कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:03 AM2020-05-17T10:03:12+5:302020-05-17T10:03:23+5:30
सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या पाळले नाही, तर अकोलेकरांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो.
अकोला : ‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णावर उपचार करून त्याला दहाव्या दिवशी कोरोनामुक्त घोषित करून त्यांना सुटी दिली जात आहे. त्यामुळेच गत काही दिवसांत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे; परंतु सुटी दिल्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णांनी सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या पाळले नाही, तर अकोलेकरांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो.
जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, रुग्णसंख्या २१८ पर पोहोचली आहे. शिवाय, कोरोनामुळे मृतकांचीही संख्या वाढत असून, हा आकडा १७ वर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत होता. दरम्यान ‘आयसीएमआर’तर्फे कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार, पहिल्या चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्यावर रुग्णालयात पूर्ण उपचार केला जाईल; परंतु त्याला दहाव्या दिवशी कुठलीही चाचणी न करता सोडण्याचेही निर्देश दिले आहेत. असे असले तरी गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेगळी नियमावली आहे. रुग्णालयातून सुटी झालेल्या अशा रुग्णांना १४ दिवसांऐवजी सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’च्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जातात; मात्र संबंधित रुग्णांनी ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या न पाळल्यास कोरोनाचे विषाणू एकापासून दुसºयापर्यंत पोहोचण्याचा धोका आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
‘होम क्वारंटीन’चे उल्लंघन
नवीन नियमानुसार, उपचारानंतर दहाव्या दिवशी कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी दिली जाते. सोबतच सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ पाळण्याबाबत सूचनाही दिली जाते; परंतु अनेकजण रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर ‘होम क्वारंटीन’च्या नियमांना तिलांजली देत सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वास्तव आहे. काहींच्या निवास्थानामध्ये स्वतंत्र राहणे शक्य नसल्याने त्यांच्याकडून ‘होम क्वारंटीन’चे नियम पाळणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचे विषाणू एकापासून दुसºयापर्यंत सहज पसरू शकतात.
हे आवश्यक...
- सुटी झाल्यानंतर रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- त्यासाठी रुग्णांनी इतरांपासून दुरावा ठेवणे आवश्यक आहे.
- मास्कचा उपयोग करणे.
- वारंवार हात धुणे.
- घरात कुठल्याही वस्तूला स्पर्श न करणे आवश्यक आहे.