अकोला : जगभरात धुमाकूळ घालणाºया ‘कोरोना’आजाराने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याच्या पृष्ठभूमीवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण मुख्यालयाने त्यांच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीची नोंद ठेवणारी ‘बायोमेट्रिक’ प्रणाली पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. मुख्यालयाचे निर्देश प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी अकोला परिमंडळातील तिन्ही जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यालयांमध्ये करण्यात आली असून, अधिकारी व कर्मचाºयांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद हजेरीपत्रकावर घेण्यात येत आहे.सद्यस्थितीत कोरोना या आजाराने चीनच्या सीमा ओलांडून इतर देशांसह भारतातही प्रवेश केला असून, महाराष्ट्रातील पुण्यात पाच रुग्ण आढळून आले आहेत. या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने आपल्या कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून बायोमेट्रिक प्रणालीचा वापर पुढील आदेश येईपर्यंत बंद केला आहे. तसे परिपत्रक महावितरण मुख्यालयाकडून ५ मार्च रोजी मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमांड शिवाजी इंदलकर यांनी जारी केले आहे.
कोरोनाचा धसका; महावितरणमध्ये ‘बायोमेट्रिक’ला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 6:35 PM