लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूपासून बचावासाठी राज्यात ठिकठिकाणी ‘सॅनिटायझर टनेल’चा वापर वाढला आहे; परंतु त्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या द्रावणात ‘सोडियम हायपोक्लोराईट’ची तीव्र मात्रा मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ‘सॅनिटायझर टनेल’चा वापर करताना जपूनच केलेला बरा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.राज्यासह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचावात्मक उपाय म्हणून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘सॅनिटायझर टनेल’ असून, मॉल्स, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालये, रुग्णालयांसह इतर ठिकाणीही या टनेलची संख्या झपाट्याने वाढत आहे.टनेलमध्ये निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात आणल्या जाणाºया द्रावणात ‘सोडियम हायपोक्लोराईट’चाही वापर केला जात आहे; परंतु ‘सोडियम हायपोक्लोराईट’चा अतिरेक मानवी शरीरासाठी घातकदेखील ठरू शकतो. चंदिगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (पीजीआयएमआर)च्या कोविड-१ समितीच्या एका अहवालानुसार, सोडियम हायपोक्लोराईटची फवारणीमुळे सुरक्षिततेची खोटी जाणीव निर्माण होऊ शकते. शिवाय, त्याचे हानिकारक दुष्परिणामदेखील होऊ शकतात.
प्रमाण व त्याचा उपयोगतज्ज्ञांच्या मते ‘सोडियम हायपोक्लोराईट’चा उपयोग हा ०.५ टक्के करणे योग्य ठरते. त्याला ‘डाकिन सोल्युशन’ म्हणूनही ओळखले जाते. क्लोरीन कम्पाउंड जंतुनाशक किंवा ब्लिचिंग एजंट म्हणून वापरला जातो.सोडियम हायपोक्लोराईट हा व्यावसायिक ब्लिच आणि क्लीनिंग सोल्युशन्सचा एक घटक आहे. जलशुद्धीकरणप्रणाली आणि जलतरण तलावांमध्ये जंतुनाशक म्हणून वापरला जातो. ५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक संहत द्रावणाचे मानवी शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
या समस्या उद््भवू शकतात...ज्वलंत वेदना, लालसरपणा, सूज आणि फोड, श्वसनमार्गाचे नुकसान तसेच अन्ननलिका, डोळ्यास गंभीर नुकसान, पोटदुखी, यासह एकाधिक अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते. जळत्या खळबळ, अतिसार आणि उलट्या होणे.
त्याऐवजी हे उपाय उपयुक्त ठरू शकतात
- इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- ‘मास्क’चा उपयोग करा.
- नियमित साबणाद्वारे हात स्वच्छ धुवा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- हॅण्ड सॅनिटायझरचा उपयोग करा.
पृष्ठभागावर उपयोगी; मानवी शरीरावर नव्हे!निर्जंतुकीकरण द्रावण हे एखाद्या पृष्ठभागावर उपयोगी सिद्ध होऊ शकते; परंतु मानवी शरीरावर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट मानवी शरीराला ते घातकच ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालात म्हटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोडियम हायपोक्लोराईटचा अतिरेक हा हानिकारक ठरू शकतो. सॅनिटायझर टनेलमध्ये त्याचा वापर हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच व्हायला हवा. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी इतर उपाययोजना केल्या तरी कोरोना विषाणूंपासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करू शकाल.- डॉ. रियाझ फारूकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.